मसालेदार मिसळ म्हटलं की लाल किंवा काळ्या मसाल्याच्या मिसळीचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. पण दिसायला थोडी हिरवट आणि चवीला थोडी मसालेदार असलेली मसालेदार मिसळ खायला मिळाली तर नाशिककर मिसळप्रेमी नक्कीच त्या ठिकाणी गर्दी करतील. नाशिकमध्ये काठेगल्ली सिग्नलजवळ असलेली कपालेश्वर मसालेदार मिसळ अशीच मिसळप्रेमींच्या पसंतीचे ठिकाण झाली आहे. रवी रकटे यांनी मसालेदार मिसळ शौकीनांसाठी गेल्या दीड महिन्यांपूर्वी कपालेश्वर मिसळची सुरुवात केली. नवी चव चाखण्यासाठी नाशिकच्या प्रत्येक परिसरातून नाशिकचे खवय्ये येथे गर्दी करु लागले आहेत. यासोबतच मूगभजी, कांदाभजी, बटाटाभजी, वडारस्सा या पदार्थांनाही इथे मागणी आहे. हिरवी मसालेदार मिसळ नाशकात मिळणाऱ्या इतर मिसळींप्रमाणे ही मसालेदार मिसळ असली तरी वेगळ्या चवीसाठी या मिसळला पसंती दिली जात आहे. पोहे त्यावर मोड आलेली उसळ, उसळीवर बारीक व जाड शेव आणि त्यावर तर्री अशी ही मसालेदार मिसळ पापड अन् दह्यासोबत सर्व्ह होते. हिरवी मसालेदार मिसळ तयार करण्यासाठी भरपूर कांदा, लसूण, जिरे भाजून घेऊन मसला तयार केला जातो. हा मसाला मसालेदार मिसळ बनवताना वापरला जातो. सोबतच तिखट हिरवी मिरची, कोथिंबीर यांचा वापर असल्याने ही मसालेदार मिसळ रसरशीत व तिखट असते. मोड आलेल्या उसळीचा दाणेदारपणा शेवटच्या घासापर्यंत जाणवत राहतो. मुगभजी मुगाच्या डाळीपासून तयार केलेली इथली भजी खरपूस अन् कुरकुरीत लागतात. मुगाची डाळ, अगदी बारीक कापलेली हिरवी मिरची, थोडं तिखट आणि खरपूस होईपर्यंत तळलेली ही मुगभजी इथे येणारा प्रत्येक खवय्या टेस्ट करतो. पुदीना चटणी किंवा मिसळच्या रस्स्यासोबत ही भजी आवडीने खाल्ली जातात. भजीसोबत मिळणारी तेलात तळलेली व मीठ लावलेली लांब मिरची या मुगभजीची टेस्ट वाढवते. बटाटा भजी कपालेश्वरची गरमागरम बटाटा भजी खाण्यासाठी कॉलेजियन्ससोबतच व्दारका परिसरातील खवय्यांची गर्दी असते. बटाट्याचे पातळ काप करुन बेसन पीठात तळलेली ही बटाटा भजी पुदीना चटणीच्या साथीने तिखट लवंगी मिरचीसोबत दिली जातात. बटाटाचे पातळ काप केल्याने ही बटाटा भजी फुगलेली आणि कुरकुरीत अशी तयार होतात. इथल्या बटाटा भजीला इतकी मागणी असते की, खवय्ये एकावर एक अशी बटाटा भजीची प्लेट फस्त करत असतात.
No comments:
Post a Comment