यात उपचारामध्ये अनेकदा यावे लागते, म्हणजेच ट्रीटमेंटच्या sittings घ्याव्या लागतात.
महिना ते दीड महिन्याच्या अंतराने पुन्हा यावे लागते. असे साधारण सात ते दहा sittings
घ्याव्या लागतात. या उपचारात लेसरची एक फायरिंग गन (firing gun) वापरण्यात येते
आणि त्या गनद्वारे उपचाराचे शॉट दिले जातात. या उपचारात आपण केसांना लेसर लाईट द्वारे
जाळतो परंतु आजकाल लेसर उपकरण्यात सुधारणा झाली असल्यामुळे शॉट घेताना त्रास अजिबात
होत नाही. फार तर फार मुंगी चावल्याने जेवढा त्रास होईल तेवढाच काय तो किरकोळ त्रास
होऊ शकतो.
इथे काही मुद्दे मी सांगू इच्छिते कारण माझ्याकडे अनेक पेशंट्स हेअर रीमूव्हल लेसरची चौकशी
करायला येतात व ते कैक गैरसमज बाळगून असतात. एकतर, आपण या उपचाराला जरी पर्मनंट
हेअर रीमूव्हल असं नाव दिलेलं असलं तरी इथे पर्मनंट व रीमूव्हल या दोन शब्दांचा चुकीचा अर्थ
काढला गेला आहे.
जरा खोलात जाऊन समजून सांगते.
चेह-यावर अनेक केस असतात. Hormones किंवा औषधांचा जेव्हा त्यांच्यावर भडीमार होतो
तेव्हा या केसांचं, म्हणजे बारीक लव (वेलस हेअर) चं रुपांतर जाड (टर्मिनल हेअर) केसामध्ये
होतं. म्हणून आधी केस वाढीचं कारण जाणून घेऊनच लेसरचा उपचार घेणं फायद्याचं असतं. जोपर्यंत
केस वाढीच्या मूळ कारणाचा नाश होत नाही तोपर्यंत लेसर सारखे उपायसुद्धा फोल ठरतात.
उदाः जर PCOS मुळे केस वाढले असतील तर स्त्रीरोगतज्ञाकडे जाऊन त्याचा आधी उपचार सुरु
करावा लागतो, किंवा कोणत्याही औषधामुळे अनावश्यक केस वाढले असतील तर मग त्या गोळ्या
बंद तरी कराव्या लागतात किंवा त्या गोळ्यांना योग्य पर्याय शोधावा लागतो. मूळ
कारणाचा उपचार केल्यानंतरच लेसर ट्रीटमेंट चा पूर्ण उपयोग होतो.
मी वर नमूद केलंच आहे की लेसरची किरणं केसांमधील मेलानिन नावाच्या रंगद्रव्याला निशाणा
बनवतं. केसाळ भागात ती गन टेकवली जाते व शॉट फायर केले जातात. आता त्या अख्या भागात
जरी शॉट मारला गला असला तरी सर्व केसांवर तो बसलाच असेल याची हमी देता येत नाही.
म्हणूनच या उपचाराचे sittings/सिटिंग्ज घ्याव्या लागतात. त्यावर, केसांच्या
जीवनचक्रानुसार, उपचारा नंतर बिजकोशातील केसाची वाढ व्हायला एक ते दीड महिना
उलटतो. आणि म्हणूनच त्या sittings/सिटिंग्ज महिना ते दीड महिन्याच्या कालावधीने
घ्याव्या लागतात. जसा उपचार पुढे सरकत जातो, केसांच्या वाढीत व पोत मध्ये फरक पडायला
लागतो. ही प्रक्रिया हळू हळू होत असते आणि म्हणून हा उपचार जास्ती वेळ चालतो.
सर्वसाधारण ८०% ते ९०% पर्यंत बिजकोश संपूर्ण नष्ट होतात व राहिलेल्या १०% ते २०%
केसांचं रुपांतर परत वेलस हेअर / लव मध्ये होतं.
आता गमंत बघा, जर का केस वाढीचं मूळ कारण परतलं ( उदाः PCOS चा परत त्रास झाला ई
), तर मात्र लेसर उपचारानंतर जे केस उरले आहेत त्या केसांची वाढ नक्कीच होऊ शकते. पण ते
पूर्ण नष्ट झालेले ८०% ते ९० % केस परत कधीच वाढत नाहीत. म्हणूनच या उपचाराचं खरं नाव
“पर्मनंट हेअर रीडकशन” असं आहे! असं कधीच होऊ शकणार नाही की १०० % केस मारले गेले. जे
लोक किंवा तज्ञ याची हमी देतात त्यांचापासून सावध राहण्याचा सल्ला मी देईन. म्हणून
आम्ही लेसरचा उपचार देताना सगळ्यांना सल्ला देतो की तुमचं केस वाढीचं मूळ कारण परत
होणार नाही याची काळजी घ्या.
माझ्याकडे अनेक स्त्रिया येतात ज्यांना चेह-यावरचे केस नकोसे झालेले असतात. आणि आज विविध
माध्यमातून इतकी जागरूकता वाढली आहे की लेसर हेअर रीमूव्हल बद्दल ढोबळमानाने सगळ्यांना
माहिती आहे. खूप हॉस्पिटल्समध्ये हा उपचार उपलब्धही असतो. पण हल्ली तर हा “वैद्यकीय”
उपचार ब्युटी पार्लर मध्ये सुद्धा सरळसोट उपलब्ध आहे! या गोष्टीची मला काळजी वाटते व
गमंतही. काळजी यासाठी वाटते कारण हा उपचार सरळ जरी वाटला तरी त्याचे दुष्परिणाम
असूच शकतात.
खरंतर उपचार म्हटलं तर परिणामाबरोबर दुष्परिणाम बरोबरीला असतोच. दुष्परिणाम टाळायचे
असतील तर उपचार कुठेही व कोणाकडूनही घेतलेला कसा चालेले? जर का अनावश्यक केस वाढीचा
तुम्हाला त्रास होत असेल तर त्या केस वाढीचं कारण शोधून त्यावर उपचार केल्यानंतरच लेसरचा
उपचार अवश्य करून घ्यावा. कारण हा उपचार निश्चित लाभदायी ठरतो!! मी तर म्हणेन की
केस वाढीचा त्रास कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. पण लेसरचा उपचार मात्रं
(qualified) तज्ज्ञ त्वचारोगतज्ञाकडूनच घ्यावा! आणि गंमत का वाटते? कारण जी गोष्ट
शिकायला आम्ही वर्षानुवर्ष घालवतो तीच गोष्ट ब्युटिशियन सहज रित्या कसं वापरू शकते?
आणि लोक जाऊन ब्युटिशियन कडून असे उपचार कसं घेऊ शकतात?
लेसर हेअर रीमूव्हलशी निगडीत आणखी एक गैर समज आहे. तो म्हणजे कोणत्याही प्रकारचे केस
मारले जातात. मी म्हटल्याप्रमाणे, लेसर उपचारात मेलानिन रंग्द्रव्यावर हमला होतो.
म्हणून केसांमध्ये मेलानिन नसेल, थोडक्यात केस पांढरे असतील, तर या उपचाराचा शून्य उपयोग
होतो. उलट या उपचाराचे दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते कारण लेसरची किरणं त्वचेत
असलेल्या मेलानिनला निशाणा बनवतं व त्वचा भाजू शकते. शिवाय, माझ्याकडे अनेक मुली व
स्त्रिया येतात ज्यांना केस वाढीचा त्रास नसतो पण त्यांना चेह-यावर बारीक लवही नको असते.
त्यांना मी हेच सांगते की, जेवढे बारीक केस तेवढं त्यांचावर कमी परिणाम होतो. याचा अर्थ
हा नाही की त्यांना उपचार घेता येत नाही. त्यांनी उपचार जरी घेतला तरी त्यांना
नेहमीप्रमाणे जास्ती सिटिंग्ज लागतात व फायदा होईलच याची खात्री नसते. जेवढे जाड केस
तेवढा उपचाराचा फायदा होतो, म्हणजे सिटिंग्जही कमी लागतात व केसांच्या वाढीत लवकर
फरक आढळतो. उलटपक्षी, ज्या स्त्रियांचे केस उपचार केल्यानंतर बारीक झालेले असतात त्यांना
आम्ही उपचार बंद करण्याचा सल्ला देतो. एका अर्थाने तो आमच्यासाठी उपचाराचा शेवट असतो.
त्यादिवशी हॉस्पिटल मध्ये माझ्या एका पेशंटने, जो पुरुष होता, मला लाजत एक प्रश्न
विचारला.“ मी पण लेसर करून घेऊ शकतो का हो?” मी त्याला म्हणाले, “जरूर करून घेऊ
शकतोस, पण कोणत्या भागाचा उपचार करायचा आहे?” त्यावर तो अजूनच ओशाळला आणि
म्हणाला “ कानावरचे व छातीवरचेसुध्दा.” मला अजिबात नवल वाटलं नाही. कारण उपचार
अगदी सहज शक्य होता आणि तो पहिला पुरुष पेशंट नव्हता ज्याने मला लेसर उपचाराबद्दल
विचारलं होतं!
जमाना आगे बढ रहा है! स्त्रियांचे व पुरुषांचे दृष्टीकोन बदलत चालले आहेत. जो उपचार
स्त्रियांपुरती मर्यादित समजला जायचा त्याबद्दल पुरुष विचार करायला लागले आहेत, ते पण
कोणताही अविर्भाव न बाळगता हे बघून आनंद होतो!