Showing posts with label डॅशिंग बायका. Show all posts
Showing posts with label डॅशिंग बायका. Show all posts

Monday, December 28, 2015

डॅशिंग बायका

मालिकांमध्ये आता पूर्वीसारख्या स्वयंपाकघरात टीपे गाळणार्‍या बायका दिसत नाहीत, दिसतात त्या धडाडीच्या नायिका. पुढे येऊन घरातल्या  समस्या, नात्यातले गुंते, व्यावसायिक पेच सोडवणार्‍या मालिकांमधल्या डॅशिंग नायिका या केवळ चर्चेपुरत्याच र्मयादित नसून त्यांना पाहून अनेकींना प्रत्यक्ष आयुष्यात प्रेरणा मिळते आहे. मालिका या समाजाचा आरसा आहेत हे खरंच म्हणायला हवं.
  ‘मानसीचा चित्रकार तो’मधील तेजस्विनी,     ‘दूर्वा’मधील दूर्वा ज्या धडाडीनं सर्व कौटुंबिक, सामाजिक संकटांचा सामना करतात ते पाहता या बायकांना जे जमतं ते आपल्याला का नाही हे पडद्यासमोरच्या बायकांना वाटतंच. माझ्या लहानपणी एक मालिका होती कविता चौधरींची  ‘उडान’ नावाची, त्यानंतर आली ती ‘रजनी.’ या दोन मालिकांचा म्हणण्यापेक्षा या मालिकांमधील त्या दोन बायकांचा प्रभाव इतका होता की, तेव्हा प्रत्येक लहान मुलीला ‘उडान’मधली कविता व्हायचं होतं आणि प्रत्येक बाईला रजनीसारखं खंबीर आणि सडेतोड. त्यानंतर आलेल्या सांस बहू मालिकांमध्येसुद्धा अनेकींना तुलसी विरानी किंवा पार्वती अगरवालसारखं व्हायचं होतं. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या, न्याय मागणार्‍या, सदसद्विवेक बुद्धीचा वापर करणार्‍या आणि षडरिपुंपासून मैलो दूर असणार्‍या अशा नायिका आज सुना किंवा सासवा बनून मालिकांमध्ये राज्य गाजवू लागल्या आहेत.  
आज हिंदी सिनेमात नायिकाप्रधान भूमिका असून, भागत नाही तर तिच्या  जोडीला नायकही असावाच लागतो. मात्र मालिकांचं असं नाही. इथे कथानक, व्यक्तिरेखा, संवाद सगळं काही नायिकेच्या बाजूनं. ‘सास भी कभी बहु थी’मध्ये किती वेळा मिहिर बदलला. पण लक्षात राहिली ती तुलसी विराणी. ‘बालिका वधू’, ‘न आना ऐसे  देश में लाडो’, ‘उतरण’, ‘ससुराल गेंदा फुल’, ‘बडे अच्छे लगते है’ या सर्व मालिकांमध्ये लक्षात राहतात त्या या मालिकांमधल्या करारी नायिकाच. 
‘बिग बॉस’, ‘रोडीज’, ‘झलक दिखला जा’, ‘स्प्लिट विलाज’ या रिअँलिटी शोज्मध्येदेखील प्रेक्षकांचं लक्ष होतं ते यातल्या स्त्री कॅरेक्टरकडेच. 
सिनेमात तरी मूळ कथानकाभोवती रोमान्स, कॉमेडी, अँक्शन, ड्रामा, गाणी या सर्व गोष्टी पेरलेल्या असतात. पाहणार्‍यांना त्याचंच जास्त आकर्षण. मात्र मालिकांमध्ये याचा मागमूसही नसतो. तरीही मालिका न चुकता पाहिल्या जातात. कारण या मालिकांमध्ये धीरानं वागणार्‍या बायका हेच पाहणार्‍याचं मुख्य आकर्षण असतं. कुटुंबाला जोडून ठेवणार्‍या, कोणत्याही प्रसंगी कोलमडून न पडता खंबीरपणे उभ्या राहणार्‍या, समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करून त्यावर उपाय शोधणार्‍या बायका आज प्रेक्षकांमध्ये प्रचंड हिट आहे. 
 आज मालिकांमधल्या नायिकांनी स्त्री प्रेक्षकांनाही प्रोफेशनचे अनेक पर्याय दिले आहेत. पोलीस, पत्रकार, वकील, नेता, धडाडीनं व्यवसाय करणार्‍या, प्रस्थापितांविरुद्ध बंड करणार्‍या नायिकांचं म्हणूनच प्रेक्षकांमध्ये स्वागत होतंय.
नकळतपणे मालिकांमधून या स्त्री नायिका समाजाचं प्रबोधन करताय. वेगवेगळ्य़ा प्रसंगातून बायका कशा वाट काढतात हेच मालिकांमधून दाखवलं जातं. कुटुंबातल्या नातेसंबंधाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं हा सर्वच मालिकांमधला समान धागा आहे.
तुम्ही जर नियमित मालिका पाहात असाल तर एक गोष्ट ध्यानात येते की, प्रत्येक मालिकेत एक स्मस्या येते. त्यातून कसा मार्ग काढायचा हे शक्यतो त्या मालिकेतल्या नायिकाच ठरवतात. म्हणजे अगदीच कोणतं महत्त्वाचं  बिझनेस डील असेल तेव्हा मालिकांमधले पुरुष नायक भलेही फायली घेऊन ऑफिसात जाताना दाखवत असतील पण हे डील कसं करावं, कसं हाताळावं, अडचणीतून मार्ग कसा काढावा हे मालिकांमधल्या नायिका अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं करतात. आज त्याचाच परिणाम म्हणजे मालिकांमधल्या नायिकांचे कपडे, दागिने, पेहराव हे जसे चर्चेचे आणि अनुकरणाचे मुद्दे होतात तसेच मालिकांमधल्या नायिकांचं धीरोदात्त वागणं हेही समाजात प्रेरणेचं काम करत आहे.
ग्रामीण भागात एक पाहणी केली असता असं आढळून आलं आहे की, करारी नायिका प्रेक्षकांवर विशेषत: स्त्री प्रेक्षकांवर भुरळ पाडतात आणि म्हणूनच हुंड्यासाठी लग्न मोडणार्‍या नवरदेवाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार्‍या बातम्या छोट्या छोट्या गावांमधूनही वाचायला आणि पाहायला मिळतात.